तेल अवीव : ७ ऑक्टोबरच्या पहाटे पॅलेस्टाइनच्या हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर अचानक हल्ला केला. तेव्हापासून इस्रायली सैन्य आणि हमासमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत ४५०० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत.
बुधवारी इस्रायलला भेट देणार : आता या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली आहे. अमेरिका इस्रायलचा कट्टर समर्थक मानला जातो. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन बुधवारी इस्रायलला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. इस्रायलनं गाझा पट्टीमध्ये प्रत्युत्तराची कारवाई तीव्र केली असल्यानं गाझामध्ये मानवतावादी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. इस्रायल हमासचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी गाझावर आतापर्यतचा सर्वात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
अमेरिका इस्रायलच्या पाठीशी : यूएस आणि इस्रायली अधिकार्यांच्या मते, नाझींनी ज्यूंवर केलेल्या अनन्वित संहारानंतर हमासचा हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. त्यामुळेच या नाजूक परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलला भेट देणार आहेत. ब्लिंकन म्हणाले की, जो बायडन यांच्या इस्रायल भेटीनंतर अमेरिका-इस्रायल संबंध मजबूत असल्याची पुष्टी होईल. अमेरिका प्रत्येक संकटात इस्रायलच्या पाठीशी आहे, हे बायडन स्पष्ट करतील, असंही ब्लिंकन यांनी नमूद केलं.