नवी दिल्ली Israel Hamas War : ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. युद्धात पॅलेस्टाईनचं जास्त नुकसान झालं असून, गाझा पट्टीतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता जगभरातील देशांकडून पॅलेस्टाईनसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय.
भारतानं पॅलेस्टाईनला मदत सामग्री पाठवली : या पार्श्वभूमीवर, भारतानंही युद्धग्रस्त पॅलेस्टाईनला मानवतावादी मदत सामग्री पाठवली. या मदत सामग्रीमध्ये बाधित लोकांसाठी वैद्यकीय वस्तू आणि आपत्ती निवारण साहित्याचा समावेश आहे. यासह भारतानं पॅलेस्टाईनला जीवनरक्षक औषधं आणि इतर वस्तूंचाही पुरवढा केलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाचं सी १७ विमान मदत साहित्य घेऊन सकाळी ८ वाजता हिंडन एअरबेस वरून उडालं. हवाई दलाचं विमान पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी सुमारे ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन गेलं आहे.
भारताकडून पॅलेस्टाईनला मदतीचा हात काय मदत पाठवली : या वैद्यकीय पुरवठ्यामध्ये जीवनरक्षक औषधं, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणं आणि शस्त्रक्रियेच्या साहित्याचा समावेश आहे. तात्काळ आरामासाठी मानवतावादी मदतीमध्ये द्रव आणि वेदनाशामक औषधही पुरवण्यात आली आहेत. यासह अंदाजे ३२ टन वजनाच्या आपत्ती निवारण सामग्रीमध्ये तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, मूलभूत स्वच्छता वस्तू आणि पाणी शुद्धीकरण गोळ्या इत्यादींचा समावेश आहे.
भारताकडून पॅलेस्टाईनला मदतीचा हात इजिप्तचीही पॅलेस्टाईनला मदत : हमासनं ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझा पट्टीवर हल्ला केला. तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. शनिवारी, मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या सुमारे २० ट्रक्सला इजिप्तची राफा सीमा ओलांडून गाझा पट्टीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं की, गाझातील २० लाखाहून अधिक लोकांना मदतीची फार गरज आहे. त्यांनी बाधित भागात वैद्यकीय आणि मदत वाहनांना सुरक्षितपणे जाण्याचं आवाहन केलंय. इजिप्तच्या या मदतीचं जगभरातून स्वागत करण्यात आलंय.
हेही वाचा :
- Hamas Israel war : इस्रायल हमास युद्धाचा 16 दिवस; गाझावर पुन्हा हल्ला करण्याची इस्रायलनं आखली योजना
- Hamas released Two US hostages : 'हमास'नं केली दोन अमेरिकन ओलिसांची सुटका; आयडीएफनं केली पुष्टी