तेल अवीव Israel Hamas War : इस्रायली संरक्षण दलानं (आयडीएफ) दावा केलाय की त्यांना गाझा येथील रुग्णालयात हमासशी संबंधित शस्त्रं सापडली आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओही त्यांनी जारी केलाय. गाझा रुग्णालयाचा वापर हमासद्वारे शस्त्रे लपवण्यासाठी केला जात असल्याचे त्यांना आणखी पुरावे मिळाले आहेत.
रुग्णालयामध्ये सापडले कमांड सेंटर : आयडीएफनं आरोप केलाय की, हमास गाझा रुग्णालयाचा वापर दहशतवादी हल्ले करण्यासाठी, स्फोटक आणि शस्त्रे साठवण्यासाठी मुख्य तळ म्हणून करत आहे. आयडीएफनं विशेषतः गाझाच्या शिफा रुग्णालयाचा उल्लेख केला. आयडीएफचा दावा आहे की, त्यांना शिफा रुग्णालयाच्या एमआरआय इमारतीत शस्त्रे, तांत्रिक उपकरणे आणि एक प्रकारचे कमांड सेंटर सापडले आहे. तसंच इस्रायली हवाई दलाचे दुसरे शलदाग युनिट आणि आयडीएफच्या 36 व्या आर्मर्ड डिव्हिजनचे कमांड गाझा आणि शिफा रुग्णालयामध्ये त्यांचे ऑपरेशन सुरू ठेवतील.
अनेक दहशतवाद्यांना केलं ठार : हमास ही दहशतवादी संघटना जिथून कारवाया करत आहे, त्या तळांचा आम्ही शोध घेणार आहोत. शिफा हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करताना आयडीएफ दलांनी अनेक दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं. आम्ही हमासच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवू. तसंच रुग्णालयातील कर्मचार्यांना हानीपासून वाचवण्यासाठी काम आम्ही करू, असंही आयडीएफनं आपल्या निवेदनात म्हटलंय.
रुग्णालयात सापडलं हमासचं ऑपरेशनल मुख्यालय :दरम्यान, रुग्णालयाच्या एका वॉर्डमध्ये शोध घेत असताना आयडीएफला एक खोली सापडली. या खोलीत 'युनिक तांत्रिक माध्यम' आणि हमासनं वापरलेली युद्ध आणि लष्करी उपकरणे होती. दुसर्या खोलीत, हमास या दहशतवादी संघटनेचे ऑपरेशनल मुख्यालय आणि तांत्रिक माध्यम होतं.