जेरुसलेम Israel Hamas conflict : पॅलेस्टाईन आणि इस्राईल या दोन देशात युद्ध सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवल्यानं हे युद्ध आणखी भडकलं आहे. मात्र आता हमास आणि इस्रायलमध्ये 50 नागरिकांच्या सुटकेपर्यंत युद्धबंदी करण्यात आली आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळानं बुधवारी हमाससोबत केलेल्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सहा आठवड्यांपासून सुरू असलेलं हे युद्ध काही काळ थांबणार आहे.
गाझामधील 240 पैकी 50 ओलिसांची करणार सुटका :गाझा पट्टीत इस्रायलचे 240 नागरिक बंदिस्त आहेत. त्यापैकी हमास 50 ओलिसांची सुटका करणार आहे. यासाठी इस्रायल सरकारनं हमासनं ओलिस ठेवलेल्या 240 नागरिकांपैकी 50 नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धविराम करण्याचा करार केला आहे. या करारानुसार एका दिवशी 10 ओलिसांची हमास सुटका करणार आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये येणाऱ्या ओलिसांमुळे युद्धबंदी राहणार आहे. इस्रायली सरकारनं बुधवारी या कराराला मंजुरी दिली आहे. अगोदर महिला आणि मुलांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती इस्रायल सरकारनं यावेळी दिली आहे.
इस्रायल हमासविरुद्ध पुन्हा करणार आक्रमण : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यांना माहिती दिली. युद्धविरामानंतर इस्रायल पुन्हा हमासविरोधात युद्ध सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र ही युद्धबंदी कधीपासून करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. मंगळवारी रात्री हमासबरोबर युद्धबंधी करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. ही बैठक बुधवारी पहाटेपर्यंत चालली. यावेळी हमाससोबत युद्धबंदी करण्याबाबतची संवेदनशिलता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केली.