वॉशिंग्टन : शास्त्रज्ञ आणि उद्योजक शिवा अय्यादुराई यांनी 2024 अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढणारे चौथे भारतीय-अमेरिकन बनले आहेत. भारतीय-अमेरिकन एरोस्पेस अभियंता हर्षवर्धन सिंह, दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यानंतर 2024 च्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे अय्यादुराई हे चौथे भारतीय वंशाचे नेते आहेत.
मुंबईत जन्म झाला आहे : मुंबईत जन्मलेल्या 59 वर्षीय अय्यादुराई यांनी अलीकडेच त्यांच्या मोहिमेची घोषणा केली. मला डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या पलीकडे जाऊन अमेरिकेची सेवा करायची आहे, असे ते म्हणाले. 'मी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढत आहे. आपण एका चौरस्त्यावर उभे आहोत, जेथून आपण एकतर सुवर्णयुगात प्रवेश करू शकतो किंवा अंधकारमय युगात प्रवेश करू शकतो', असे ते म्हणाले.
1970 मध्ये भारत सोडला : आपल्या प्रचार अभियानात त्यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. मोठे राजकीय नेते, वकील-लॉबिस्ट आणि शिक्षणतज्ञ जे राज्य आणि स्थानिक सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि भांडवलशाही पसरवतात, ते अमेरिकेला महान बनण्यापासून रोखतात, असे विचार त्यांनी मांडले. अय्यादुराई 1970 मध्ये भारत सोडून अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहायला गेले. त्यांनी त्यांच्या मोहिमेच्या वेबसाइटवर सांगितले की, त्यांनी 1970 मध्ये भारतातील जातिव्यवस्था सोडली, जिथे त्यांच्या जातीला अस्पृश्य आणि निंदनीय मानले जात असे.
ट्विटरचे सीईओ बनण्यास स्वारस्य दाखवले होते : प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून चार पदव्या घेतलेले अय्यादुराई यांनी गेल्या वर्षी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्यास स्वारस्य दाखवले होते. त्याच्या मोहिमेच्या वेबसाइटनुसार, त्यांनी सात हाय-टेक कंपन्या सुरू केल्या आहेत. यात इकोमेल, सायटोसोलव्ह आणि सिस्टम्स हेल्थ यांचा समावेश आहे. ते केवळ 14 वर्षांचे असताना त्यांनी ई-मेलचा शोध लावला होता. ते सध्या Cytosolve चे संस्थापक आणि CEO आहेत. ही कंपनी स्वादुपिंडाच्या कर्करोगापासून अल्झायमरपर्यंतच्या प्रमुख आजारांवर उपचार शोधते.
हेही वाचा :
- US President Race : अमेरिकेत भारतीयांचा दबदबा, अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा तिसरा उमेदवार उतरला
- Ban Sikh From Growing Beard : शीख सैनिकांना दाढी वाढविण्यास बंदी; 'हे' दिले कारण
- Telangana Girl Hungry In America : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलगी उपासमारीने त्रस्त, आईने लिहिले परराष्ट्र मंत्र्यांना पत्र