वॉशिंग्टन : अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या निवडणुका भारतासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कारण भारतीय वंशाचे अमेरिकन लोक देखील जगातील सर्वात शक्तिशाली पदासाठी आपली उमेदवारी सादर करणार आहेत. भारतीय वंशाच्या निक्की हेलीनंतर आता आणखी एका भारतीय तरुणाने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विवेक रामास्वामी हे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे उद्योजक, पुराणमतवादी भाष्यकार आणि लेखक आहेत.
कोण आहेत विवेक रामास्वामी? : 37 वर्षीय विवेक रामास्वामी हे तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे उद्योगपती आहेत. ते लहान असताना त्यांचे पालक केरळमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले. रामास्वामी यांनी 2014 मध्ये रोइव्हंट सायन्सेसची स्थापना केली आणि 2015 आणि 2016 च्या सर्वात मोठ्या बायोटेक IPO चे नेतृत्व केले. विवेकने एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. रिपब्लिकन अध्यक्षीय प्राइमरीमध्ये प्रवेश करणारे ते दुसरे भारतीय-अमेरिकन आहेत. विवेक रामास्वामी या मुलाखतीत म्हणाले, 'आज रात्री मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी या देशात त्या आदर्शांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सामील होत आहे.'