युनायटेड नेशन्स: महिला, शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावरून आता भारताने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. भारताने म्हटले की, अशा दुर्भावनापूर्ण प्रचाराला उत्तर देणे देखील अनपेक्षित आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीर मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मंगळवारी भुट्टो यांचे विधान निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा: यावेळी कंबोज म्हणाल्या की, 'माझे भाषण संपण्यापूर्वी मी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाबाबत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेले स्वस्त, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित वक्तव्य आम्ही नाकारतो.' युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये 'महिला, शांतता आणि सुरक्षा' या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान कंबोज म्हणाल्या, 'माझ्या शिष्टमंडळाला असे वाटते की, अशा दुर्भावनापूर्ण आणि खोट्या प्रचाराला उत्तर देणे योग्य नाही. उलट आपला फोकस हा सकारात्मक आणि पुढचा विचार करणारा असावा. आजची चर्चा महिला, शांतता आणि सुरक्षा हा अजेंडा पूर्णत: अंमलात आणण्यासाठी आमच्या सामूहिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही चर्चेच्या विषयाचा आदर करतो आणि वेळेचे महत्त्व ओळखतो, असेही कंबोज म्हणाल्या.