नवी दिल्ली India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप करत कॅनडानं १८ सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. तेव्हापासून भारत आणि कॅनडात राजनैतिक तणाव निर्माण झालाय. त्यानंतर भारतानं कॅनडाच्या एका उच्च राजनैतिक अधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश जारी केले होते.
भारतानं अल्टिमेटम दिला होता : या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कॅनडानं भारतातून आपल्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलावलं आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरुवारी ओटावा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 'आम्ही भारतातून आमचे ४१ अधिकारी परत बोलावले. हे अधिकारी आणि त्यांचे कुटुंब भारत सोडून गेले आहेत', असं त्यांनी सांगितलं. ३ ऑक्टोबरला भारत सरकारनं कॅनडाला इशारा दिला होता की, जर कॅनडानं १० ऑक्टोबरपर्यंत भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी केली नाही तर त्यांचं राजनैतिक स्वातंत्र्य काढून टाकलं जाईल.
भारतातील नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली : यानंतर कॅनडा सरकारनं भारतातील आपल्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली. 'भारतातील प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियात कॅनडाला विरोध होत आहे. भारतात कॅनडाविरोधी आंदोलनं आणि निदर्शनं होण्याची शक्यता आहे. कॅनेडियन लोकांना धमकावलं जाऊ शकतं आणि त्रासही दिला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगा. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती सांगू नका', असं या अॅडव्हायजरी मध्ये म्हटलंय.