इस्लामाबाद (पाकिस्तान): 2019 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान राजस्थानमधील बाडमेर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीका केली होती. आम्ही त्यांना जगभरात कटोरा घेऊन भीक मागायला लावले, असे ते त्यात म्हणत आहेत. त्यांचा हाच व्हिडीओ पाकिस्तानमध्ये विरोधक असलेल्या इम्रान खान यांच्या समर्थकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यावरून आता राजकारण चांगलेच पेटले आहे.
मोदी म्हणाले, आम्ही घरात घुसून मारतो:व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा पीएम मोदींच्या बाडमेरमधील भाषणाचा एक भाग आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान राजस्थानमधील बाडमेर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी पाकिस्तानकडून मिळत असलेल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांचाही उल्लेख केला आहे. त्यात मोदी म्हणाले, 'आम्ही पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे सोडून दिले आहे. पाकिस्तान रोज अणुबॉम्बच्या धमक्या देत असे, मग आमच्याकडे असलेली अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवली आहेत का? दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारतो.'
ट्विटरवर व्हिडीओ व्हायरल:पाकिस्तानचे माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान स्वाती यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विट करत त्यांनी पाकिस्तान सरकारला लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे. यासह आझम खान यांनी पाकिस्तानात सत्ताबदल करण्याचे आवाहनही केले आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना पत्रकार नाइला इनायत यांनी पीटीआयच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, 'पीटीआय लोकांना वाटते की मोदी शेहबाज शरीफ यांच्या सरकारबद्दल बोलत आहेत, परंतु व्हिडिओ 2019 चा आहे आणि त्यावेळी इम्रान खान पंतप्रधान होते.' त्यावर लोकं म्हणत आहेत की, लष्करामुळे देशाची प्रगती होऊ शकली नाही. ज्यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावेळी इम्रानचे सरकार होते.
पाकिस्तान आर्थिक संकटात:पाकिस्तान दीर्घ काळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. पाकिस्तानची स्थिती श्रीलंकेसारखी होत आहे. तो जवळपास दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. आर्थिक संकट आणि दहशतवादाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. इम्रान खान आणि शहबाज शरीफ एकमेकांवर लष्करशाहीचे आरोप करत आहेत. दुसरीकडे, नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित क्षेत्र जवळपास दोन दशके मागे ढकलले गेले आहेत. या आव्हानांच्या पलीकडे पाकिस्तानमध्ये सध्या आशेचा काही किरण असेल तर तो म्हणजे फक्त परदेशातून मिळणारी मदत.
हेही वाचा: आर्थिक हलाखीमुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात श्रीलंकेसारखी परिस्थिती होणार