गाझियाबाद (उ. प्रदेश) : भारतीय हवाई दलाचे C130J-हरक्यूलिस विमान आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांसह गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून मंगळवारी रात्री सीरियाला रवाना झाले. या विमानात 6.5 टन जीवनरक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय औषधांचा साठा आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली.
भारत भूकंपग्रस्तांच्या पाठीशी : परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट केले की, 'हवाई दलाचे एक विमान सहा टन आपत्कालीन मदत घेऊन सीरियाला रवाना झाले आहे. विमानाच्या या खेपेमध्ये जीवरक्षक औषधे आणि आपत्कालीन वैद्यकीय वस्तूंचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत भारत एकजुटीने उभा आहे. सोमवारी तुर्की आणि सीरियात भूकंपाचे भीषण धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर यांची तीव्रता 7.8 एवढी नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे.
आपत्कालीन औषधे पाठवली : आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्ते राजेश नायर म्हणाले, 'विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी जीव वाचवणारी औषधे आणि इतर उपकरणे सीरियाला पाठवली जात आहेत. ही औषधे आणि इतर उपकरणे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या समन्वयाने पाठवली जात आहेत. ते पुढे म्हणाले की, 'अशा परिस्थितीत रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या औषधांची यादी तयार करण्यात आली आहे. मंत्रालयाने दिलेल्या यादीनुसार औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.