तेल अवीव Hamas released Two US hostages : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला आज दोन आठवडे पूर्ण होत आहेत. हमासनं शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी इस्रायलवर हल्ला केला होता. दरम्यान, यात एक नवा ट्विस्ट आलाय. 'हमास'नं दोन अमेरिकन ओलिसांची सुटका केलीय. कतारच्या मध्यस्थीनं दोघांची सुटका करण्यात आली. इस्रायल संरक्षण दलानं त्यांच्या सुटकेची पुष्टी केलीय. दोन्ही अमेरिकन नागरिक आता इस्रायली सैनिकांच्या ताब्यात आहेत.
'हमास'च्या प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय :'हमास'च्या सैन्य विंगच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, कतारच्या मध्यस्थीनंतर दोघींना मानवतावादी आधारावर सोडण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेले दावे खोटे आणि निराधार असल्याचं या प्रसिद्धपत्रकात म्हटलंय. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं ज्युडिथ ताई रानन आणि नताली शोशाना रानन या अमेरिकन ओलिसांची सुटका केल्याची खात्री केलीय. तसंच इस्रायली अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलंय की, त्यांना इस्रायलमधील सैन्य तळावर नेण्यात आलंय. तिथं त्यांचं कुटुंबीयदेखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर इतर ओलिसांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून उर्वरित ओलिसांचीही सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देत आयडीएफचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हागारी म्हणाले, हमास सध्या मानवतावादी कारणांसाठी ओलिसांची सुटका करत असल्याचं जगाला वाटतंय. खरं तर 'हमास' हा एक घातक दहशतवादी गट असून त्यांनी लहान मुलं, महिला आणि वृद्धांना कैद करुन ठेवलंय.