इस्लामाबाद :पाकिस्तानचे आरोग्य मंत्री अब्दुल कादिर पटेल यांनी शुक्रवारी सांगितले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे मानसिक संतुलन संशयास्पद आहे. इम्रान खान यांच्या लघवीच्या नमुन्यात अल्कोहोल आणि कोकेनसारख्या विषारी रसायनांचा पुरावा सापडल्याचा आरोप आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) येथे 9 मे रोजी अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाल्यानंतर जाहीर झालेल्या वैद्यकीय अहवालावर पटेल यांनी हे विधान केले.
अहवाल सार्वजनिक करणार : ते म्हणाले की, 'वरिष्ठ डॉक्टरांचे पाच सदस्यीय पॅनल इम्रान खान यांच्या मानसिक स्थिरतेवर शंका असल्याचे सांगत आहेत. ते म्हणाले की, इम्रान खान यांचा वैद्यकीय अहवाल देशाला दाखवला जाईल कारण तो सार्वजनिक दस्तऐवज आहे. हा वैद्यकीय अहवाल सांगतो की, जेव्हा डॉक्टर्स इम्रान खान यांच्याशी बराच वेळ बोलले तेव्हा त्याची कृती निरोगी व्यक्तीसारखी नव्हती.
पायाला फ्रॅक्चर असल्याचा उल्लेख नाही :इम्रान खान यांच्या लघवीच्या नमुन्याच्या प्राथमिक अहवालात अल्कोहोल आणि कोकेन सारख्या विषारी पदार्थांची उपस्थिती असल्याचा आरोपही पटेल यांनी केला आहे. खान यांच्या वैद्यकीय अहवालात पायात फ्रॅक्चर (हाड तुटल्याचा) उल्लेख नाही, तरीही त्यांनी पाच - सहा महिन्यांपासून पाय प्लास्टरमध्ये ठेवला होता, असा दावाही मंत्र्यांनी केला आहे.
डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी : गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी पंजाब प्रांतात फेडरल सरकारच्या विरोधात काढलेल्या मोर्चात इम्रान खान थोडक्यात बचावले होते. त्यांच्या उजव्या वासराला आणि मांडीला गोळ्या लागल्या होत्या. पटेल म्हणाले की, 'तुम्ही कधी त्वचेवर किंवा स्नायूवरील जखमेवर प्लास्टर लावताना पाहिले आहे का?' इम्रान खान यांचा पाय मोडल्याचे खोटे जाहीर करणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पाकिस्तान मेडिकल अँड डेंटल कौन्सिल (पीएमडीसी) च्या शिस्तपालन मंडळाला पत्र लिहिणार असल्याचे मंत्री म्हणाले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून खानला अटक केल्यानंतर पाकिस्तानभर हिंसाचारासाठी पीटीआय आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई होत असताना त्यांचा हा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Imran Khan Bail : इम्रान खान यांना मोठा दिलासा, सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर