कराची (पाकिस्तान) : कराची पोलिस प्रमुखांच्या इमारतीवर तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युतरात सुरक्षा दलांनी पाच अतिरेकी मारले आहेत. इमारतीचा ताबा मिळविण्यासाठी सुमारे चार तास चाललेल्या या मोहिमेला रात्री 10.50 च्या सुमारास यश आले. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन पोलीस हवालदार, एक रेंजर्स कर्मचारी आणि एक नागरिक यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
पाच दहशतवादी मारले गेले : या कारवाईदरम्यान पाच दहशतवादी मारले गेल्याचे एका वरिष्ठ सुरक्षा सूत्राने सांगितले. तो म्हणाला की, बराच वेळ चाललेल्या चकमकीत तिघे ठार झाले तर दोघांनी स्वत:ला उडवले. यामुळे इमारतीच्या एका मजल्यावर काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंध सरकारचे प्रवक्ते मुर्तझा वहाब यांनी ट्विटरवर पुष्टी केली की, कराची पोलिस कार्यालयाची इमारत मोकळी केली गेली असून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. १७ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत साशंकत होती. पोलिस सूत्रांनुसार त्यांची संख्या आठ आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'इमारतीवर ताबा घेतल्यानंतर कोम्बिंग आणि क्लीन अप ऑपरेशन काळजीपूर्वक केले जात आहे. ओळख प्रक्रिया अद्याप सुरू आहे. किती दहशतवाद्यांनी इमारतीवर हल्ला केला हे निश्चितपणे सांगण्यास थोडा वेळ लागेल. उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल'.
पोलिसांच्या गणवेशात इमारतीत घुसले : दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटके होती. ते पोलिसांचा गणवेश परिधान करून इमारतीत घुसले होते. हा हल्ला प्रांतीय सरकारसाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. हल्याचे ठिकाण असेलेले कराची पोलीस प्रमुख कार्यालय आणि सदर पोलीस स्टेशन मुख्य शाहराह-ए-फैसल रस्त्यावर स्थित आहे, जो कराचीचा मुख्य मार्ग आहे. येथून जवळच पाकिस्तान हवाई दलाचा फैसल तळ तसेच अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत.