वॉशिंग्टन :लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांची अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एरिक गार्सेटी यांना शपथ दिली. गार्सेटी यांनी शपथ घेताना म्हटले की, 'मी शपथ घेतो की मी सर्व परदेशी आणि देशांतर्गत शत्रूंविरुद्ध युनायटेड स्टेट्सच्या राज्यघटनेचे समर्थन आणि रक्षण करीन. अमेरिकेच्या राज्यघटनेप्रती माझी खरी निष्ठा आणि विश्वास असेल'.
52 विरुद्ध 42 मतांनी विजय मिळवला : शपथविधीनंतर कमला हॅरिस यांनी गार्सेटी यांचे भारतात अमेरिकेचे नवे राजदूत झाल्याबद्दल अभिनंदन केले. 15 मार्च रोजीच अमेरिकन संसदेने लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांची अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून पुष्टी केली होती. गार्सेटी यांनी 52 विरुद्ध 42 मतांनी विजय मिळवला आहे. अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने देखील या लॉस एंजेलिसच्या माजी महापौरांना भारताचे राजदूत होण्यासाठी त्यांच्या बाजूने मतदान केले. रिपब्लिकन सिनेटर्स टॉड यंग आणि बिल हेगर्टी यांनी समितीच्या सर्व डेमोक्रॅटमध्ये गार्सेटींच्या बाजूने मतदान केल्यानंतर पॅनेलने 13 - 8 मतांनी त्यांचे नामांकन मंजूर केले.