नवी दिल्ली :भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये लडाखच्या भूभागावरुन चांगलाच वाद सुरू आहे. मात्र या दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली. या चर्चेत पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवरुन सैन्य मागे घेण्याच्या प्रस्तावावर खुलेपणाने चर्चा करण्यात आली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर आता मात्र परिस्थिती बदलली असून दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्याचे ठरवले आहे.
शांतता प्रस्तापीत करण्यावर दोन्ही बाजूंचा भर :गलवान खोऱ्यात झालेल्या सैनिकांच्या धक्काबुक्कीत दोन्ही देशांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. यात भारतीय जवानांनाही वीरमरण आले होते. मात्र ही हानी टाळण्यासाठी आता दोन्ही देशांच्या सरकारने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दोन्ही देशांकडून आग्रह धरण्यात येत आहे. भारत-चीन सीमा प्रकरणांवर (WMCC) सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत समितीची 27 वी बैठक 31 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथे झाली आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन : परराष्ट्र मंत्रालयाचे पूर्व आशियाच्या संयुक्त सचिवांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि महासागर व्यवहार विभागाचे महासंचालकांनी केले. दोन्ही बाजूंनी भारत-चीन सीमा भागातील पश्चिम सेक्टरमधील एलएसी बाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.