नवी दिल्ली Death Penalty Indian Navy Personnel In Qatar:गेल्या वर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतार न्यायालयाच्या या निर्णयावर भारत सरकारनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. कतारमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध सुरू असल्याचं भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं.
नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना अटक :भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं की, "अल दाहरा कंपनीत काम करणार्या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना कतारमधील न्यायालयानं आपला निर्णय देत फाशीची शिक्षा केली आहे. यामुळं आम्हाला धक्का बसला आहे. फाशीच्या शिक्षेच्या निकालाच्या प्रतीची वाट आम्ही वाट पाहात आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे."
सर्व कायदेशीर सहाय्य देणार :भारत सरकारनं पुढं म्हटलं आहे की, "आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर सहाय्य देणार आहोत. आम्ही कतार न्यायालयाचा हा निर्णय तिथल्या अधिकार्यांसमोरही मांडू. या प्रकरणाच्या गंभीरतेमुळं यावेळी अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही."