इस्लामाबाद :पाकिस्तानातील नवाबशाहमधील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी हजारा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, या अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 80 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी मीडिया डॉन न्यूज टीव्हीच्या रिपोर्टनुसार, ट्रेन कराचीहून रावळपिंडीला जात होती. सध्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य (Pakistan Train Accident) सुरू आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू - लाहोरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे आणि विमान वाहतूक मंत्री ख्वाजा साद रफिक म्हणाले की, या घटनेबाबत अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मंत्री ख्वाजा साद रफिक यांनी दिली आहे.
प्रत्यक्षदर्शींची माहिती - सरहरी रेल्वे स्थानकाच्या बाह्य सिग्नलवर ही घटना घडल्याचे एका प्रवाशाने सांगितले आहे. ते म्हणाले की, काही लोक पाच डबे रुळावरून घसरल्याचे सांगत आहेत, काही लोक आठ डबे रुळावरून घसरल्याचे सांगत आहेत तर काही लोक 10 डबे रुळावरून घसरल्याचे सांगत आहेत. पण सध्या याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
हजारा एक्स्प्रेसचे डबे घसरले - शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. यात ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि बचावकार्य करणाऱ्या टीम दाखल झाल्या आहेत. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताचे कारण अस्पष्ट - अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफीक वर्तवली आहे. मात्र, या अपघातामागचे मूळ कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प आहे. पाकिस्तानचे लष्कर बचावकार्यात मदत करत आहेत.