वॉशिंग्टन :एक कथित चिनी गुप्तहेर बलून अमेरिकेच्या हवाई हद्दीत दिसला, असे पेंटागॉनने म्हटले आहे. या बलूनचा आकार जवळपास तीन बसेस एवढा होता. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्या बीजिंग भेटीच्या काही दिवस अगोदर ही घटना घडली आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, अमेरिकन सरकारने सध्या अमेरिकेच्या हवाई हद्दीत उडत असलेला हा बलून शोधून काढला आहे. त्याचा मागोवा घेणे चालू आहे. उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) सध्या त्याचा मागोवा घेत आहे आणि घटनेचे बारकाईने निरीक्षण करत आहे, असे ते म्हणाले.
मोंटाना शहरावर बलून दिसला : गुरुवारी अमेरिकेच्या मोंटाना शहरावर हा बलून दिसला होता. हा बलून सापडल्यानंतर अमेरिकन सरकारने त्यांच्या संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी कारवाई केली आहे, असे रायडर म्हणाले. ते म्हणाले की, हा बलून व्यावसायिक हवाई वाहतुकीच्या उंचीवर प्रवास करत होता. त्याचा जमिनीवर असलेल्या लोकांना कुठलाही लष्करी किंवा शारीरिक धोका नव्हता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने या प्रकरणी सांगितले की, पेंटागॉन या घटनेवर विविध पर्यायांची चाचपणी करत आहे.