बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 'ब्रिक्स समीट' दरम्यान भेट झाली. कोरोना काळापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची होती.
चीन-भारत संबंध सुधारण्यात दोन्ही देशांचे हित : 'चीन-भारत संबंध सुधारण्यात दोन्ही देशांचे हित आहे. या भेटीत त्यावर भर दिला गेला', असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी शुक्रवारी सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये, सध्याचे चीन-भारत संबंध तसेच सामायिक हिताच्या इतर प्रश्नांवर विचारांची देवाणघेवाण झाली. चीन-भारत संबंध सुधारणे हे दोन्ही देशांचे आणि लोकांचे समान हित साधते. ते या क्षेत्राच्या शांतता, स्थिरता आणि विकासासाठी अनुकूल आहे. राष्ट्राध्यक्ष शी यांनी यावर भर दिला', असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
मोदींनी लडाखचा मुद्दा उपस्थित केला : 'दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांचे हित लक्षात घेतले पाहिजे. त्या अनुसार सीमेचा प्रश्न योग्यरित्या हाताळला पाहिजे. जेणेकरून सीमावर्ती भाग शांत आणि सुरक्षित ठेवता येईल', असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील समस्यांवर प्रकाश टाकला. दोन्ही नेत्यांनी याच्याशी संबंधित अधिकार्यांना, डी-एस्केलेशनचे प्रयत्न तीव्र करण्यासाठी निर्देश देण्याचे मान्य केले.