बीजिंग :चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग हे गेल्या एका महिन्यापासून गायब आहेत. आता त्यांची परराष्ट्र मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मंगळवारी देशाच्या संसदेने किन गॅंग यांच्या जागी वांग यी यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली. वांग यी यांनी यापूर्वी जवळपास 10 महिने देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले होते.
डिसेंबरमध्येच केली होती नियुक्ती : पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 14 व्या नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) च्या स्थायी समितीच्या चौथ्या अधिवेशनात आज यासंबंधीचे मतदान घेण्यात आले. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. 57 वर्षीय किन गँग यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या सोबतच चीनच्या सर्वोच्च विधिमंडळाने पॅन गोंगशेंग यांची देशाच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.
25 जूननंतर दिसले नाहीत : किन गँग शेवटचे सार्वजनिकरित्या 25 जून रोजी दिसले होते. तेव्हा त्यांनी रशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या नियोजित बैठका एकतर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा वांग त्यांच्या जागी गेले आहेत. वांग यांनी किन यांच्या जागी जकार्ता आणि जोहान्सबर्ग येथे झालेल्या राजनैतिक शिखर परिषदेत चीनचे प्रतिनिधित्व केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे किन 'आरोग्याच्या कारणास्तव' उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले होते.
एका महिन्यापासून बेपत्ता आहेत : किन गँग चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या भेटीदरम्यान गायब होते. तेव्हापासून विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच जुलैच्या सुरुवातीला ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांच्याशी चिनी अधिकार्यांच्या चर्चेला देखील ते उपस्थित नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते जवळपास एका महिन्यापासून बेपत्ता आहेत. चीन मात्र याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही बोललेला नाही.
हेही वाचा :
- Foreign Minister : महिला पत्रकारासोबत अफेअर? परराष्ट्र मंत्री महिन्याभरापासून गायब
- UPI In Sri Lanka : आता श्रीलंकेतही करता येणार UPI द्वारे पेमेंट, दोन देशांमध्ये झाला सामंजस्य करार
- Israel Protest News : हजारो इस्रायली नागरिकांचा बेंजामिन नेतन्याहू सरकारच्या न्यायिक विधेयकाला विरोध; अंतिम मतांपूर्वी तीव्र आंदोलन