तेजपूर (आसाम) : चीनने पुन्हा एकदा पूर्व भारतातील राज्य अरुणाचल प्रदेशकडे आपले लक्ष वळवले आहे. चीनच्या सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने दक्षिण तिबेट अंतर्गत अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणे घोषित केली आहेत. या यादीमध्ये नद्या, पर्वत, जमीन आणि निवासी क्षेत्रांचा समावेश आहे. चिनी सैन्याची गरुड नजर नेहमीच अरुणाचल प्रदेशात असते. अनेकदा त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. 9 डिसेंबर रोजी त्यांनी तवांगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जो शूर भारतीय सैन्याच्या जोरदार प्रतिकारामुळे अयशस्वी झाला आणि चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी मागे ढकलले. अरुणाचल प्रदेशवर चीनने आपला दावा जाहीर करण्याची ही तिसरी वेळ आहे.
तिसऱ्यांदा केला दावा :यापूर्वी 2017 मध्ये, चीनने प्रथमच दक्षिण तिबेटमधील सहा ठिकाणांवर दावा केला होता, त्यानंतर 2021 मध्ये आणि आज पुन्हा 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी चीनने भारतीय राज्य पुन्हा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने अरुणाचल प्रदेशातील शहरांच्या नावांसाठी चीनी, तिबेटी आणि पिनयिन वर्णांचा तिसरा संच जारी केला आहे.
तिबेटचा दक्षिण भाग म्हणून दावा :चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशसाठी या 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. झंगनान, तिबेटचा दक्षिण भाग, असे नाव चीनी मंत्रिमंडळाने जारी केले आहे, असे ग्लोबल टाईम्सने वृत्त दिले आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील दोन भूभाग, दोन नद्या, पाच पर्वत, आणि दोन निवासी क्षेत्रांचा समावेश असलेल्या 11 स्थळांची नावे प्रसिद्ध केली आहेत आणि दोन निवासी क्षेत्रांची नावे चिनी भाषांमध्ये ठेवण्यात आली आहेत.
भारताचे जोरदार प्रत्त्युत्तर :परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची डिसेंबर 2021 मध्ये म्हणाले, 'चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांचे अशा प्रकारे नामांतर करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून, कायम राहील. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना नवी नावे दिल्याने ही वस्तुस्थिती बदलत नाही. ग्लोबल टाइम्स हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेली ग्रुप ऑफ प्रकाशनांचा भाग आहे. नावांची घोषणा करणे हे एक कायदेशीर पाऊल आहे आणि भौगोलिक नावांचे प्रमाणीकरण करणे हा चीनचा सार्वभौम अधिकार आहे, असे चिनी तज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: केंद्र सरकारचा नवा प्लॅन, हज यात्रा होणार कॅशलेस