जोहान्सबर्ग : 15 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत आहेत. ब्रिक्स नेत्यांच्या पत्रकार परिषदेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संभाषण करताना दिसले. BRICS ही ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांची संघटना आहे. या पाच देशाच्या संघटनेला BRICS असं म्हटलं जातं. पत्रकार परिषदेच्या आधी, पंतप्रधान मोदी, चीनचे राष्टाध्यक्ष शी जिनपिंग त्यांच्या नियुक्त ठिकाणी बसण्यापूर्वी थोडक्यात गप्पा मारताना दिसले. नोव्हेंबर 2022 मध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीनंतरची ही पहिली भेट आहे. आज झालेल्या ब्रिक्स परिषदेनंतर सर्वच नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
2022 नंतर पहिलीच भेट : यावेळी दक्षिण आफ्रिका ब्रिक्स परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. 40 पेक्षा अधिक देशांना ब्रिक्स संघटनेत येण्याची इच्छा असल्याचा दावा दक्षिण अफ्रिकेनं केला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील बाली येथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. G20 परिषदेत रात्रीच्या जेवणावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या.
5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था :15 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मंगळवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. जोहान्सबर्गमधील शिखर परिषदेची सुरुवात ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्सच्या संवादाने झाली. परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या नेत्यांना संबोधित करत त्यांच्यासमोर पाच प्रस्ताव ठेवले. ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्सच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे. येत्या काही वर्षांत भारत जागतिक विकासाचे इंजिन सिद्ध होणार असल्याचा विश्वास देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
महात्मा गांधीनी रचला पाया : ब्रिक्स देशांच्या राष्ट्राध्यक्षांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जोहान्सबर्गसारख्या सुंदर शहरात पुन्हा एकदा येणे माझ्यासाठी आणि माझ्या शिष्टमंडळासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या शहराचा भारतातील लोकांशी आणि भारताच्या इतिहासाशी खोलवर संबंध आहे. महात्मा गांधींनी भारत, युरेशिया आणि आफ्रिकेच्या महान विचारांची सांगड घालून परस्पर सौहार्दाचा भक्कम पाया रचला होता, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा -
- Pm Narendra Modi In G20 : जग भारतीय अर्थव्यवस्थेकडं मोठ्या विश्वासानं पाहते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल; 'चांद्रयान 3' च्या लँडिंगवेळी डिजिटली कनेक्ट राहणार
- Pm Modi To Leave SA Today : पंतप्रधान आजपासून जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, ब्रिक्स शिखर परिषदेत होणार सहभागी