ढाका Sheikh Hasina : बांगलादेशच्या पंतप्रधान आणि अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांनी रविवारी (7 जानेवारी) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळविला आहे. विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळं त्यांच्या पक्षाचा विजय सुकर झाल्याचं मानलं जात आहे. विरोधकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार हा चर्चेचा विषय ठरला आहे.
शेख हसीनांचा विजय निश्चित : शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षानं संसदीय निवडणुकीत 300 पैकी 200 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेशात सरकार स्थापनेकरता राजकीय पक्षाला 151 जागावर विजय मिळवावा लागतो. अशा स्थितीत शेख हसीना पाचव्यांदा सत्तेवर येणं निश्चित आहे. हसीना (76) यांना गोपालगंज-3 जागेवरून 249,965 मतं मिळाली. या जागेवर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बांगलादेश सुप्रीम पार्टीचे एम निजाम उद्दीन लष्कर यांना केवळ 469 मतं मिळाली. शेख हसीना 1986 नंतर आठव्यांदा गोपालगंज-3 मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
जेमतेम 40 टक्के मतदान : बांगलादेशात नजरकैदेत असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं या निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निवडणुकीतील टक्केवारीही कमी राहिली. सध्याच्या सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि विश्वासार्ह नसल्याचा आरोप पक्षानं केला आहे. बांगलादेशात रविवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे 40 टक्के मतदान झालं. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण मतदान 80 टक्क्यांहून अधिक होतं.
बांगलादेशातील निवडणूक : शेख हसीना पुन्हा पंतप्रधान बनल्यास ही त्यांची पाचवी टर्म असेल. हसीना या 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधान होत्या. त्यानंतर 2009 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. तेव्हापासून आजतागायत त्या सत्तेत आहेत. बांगलादेशच्या संसदेत एकूण 350 जागा आहेत. त्यापैकी 50 जागा महिलांसाठी राखीव आहेत. राखीव जागांसाठी निवडणुका होत नाहीत. 300 जागांसाठी तर दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात.
हे वाचलंत का :
- पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मालदीवचे तीन मंत्री निलंबित
- बांगलादेश निवडणूक; पंतप्रधान शेख हसीना यांचं भवितव्य पणाला, ७ जानेवारीला मतदान