तैपेई Taiwan Election :तैवानमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार लाय चिंग ते यांनी बाजी मारली आहे. लाय चिंग आणि त्यांचा पक्ष चीनचे कट्टर विरोधक मानले जातात.
चीननं फुटीरतावादी घोषित केलं होतं : आज शनिवारी (13 जानेवारी) सकाळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. तैवानसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. कारण ती पुढील चार वर्षांत चीनसोबतच्या संबंधांची दिशा ठरवू शकते. चीननं निवडणुकीपूर्वीच लाय चिंग ते यांना फुटीरतावादी घोषित केलं होतं. चीननं तैवानच्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं होतं की, जर त्यांना लष्करी संघर्षाची परिस्थिती टाळायची असेल तर त्यांना योग्य पर्याय निवडावा लागेल.
सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले : देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती लाय चिंग ते, हे तैवानवरील चीनच्या दाव्यांना विरोध करतात. या विजयासह लाय चिंग यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीनं सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येऊन इतिहास रचला. मात्र तैवानमधील लाय चिंग यांच्या विजयानंतर चीन आणि तैवानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चीन आणि तैवान यांच्यात संघर्ष का : तैवान हे चीनच्या दक्षिण-पूर्व किनार्यापासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर स्थित एक लहान बेट आहे. हे बेट 1949 पासून स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र मानतं. परंतु आतापर्यंत जगातील केवळ 14 देशांनी याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि त्याच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. चीन तैवानला आपला एक प्रांत मानतो. दुसरीकडे, तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणतो, ज्याचं स्वतःचं संविधान आहे आणि निवडून आलेलं सरकारही आहे.
हे वाचलंत का :
- 'या' देशात राम मंदिर सोहळ्यानिमित्त मिळणार 2 तासांची विशेष सुट्टी!
- शेख हसीना पाचव्यांदा होणार बांगलादेशच्या पंतप्रधान, 'या' कारणानं निवडणूक राहिली चर्चेत
- इराणमध्ये जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ भीषण स्फोट, 100 हून अधिक जणांचा मृत्यू