अंकारा (तुर्की) : सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसल्यानंतर तुर्की आज पुन्हा भूकंपाने हादरला आहे. गेल्या दोन दिवसांतील भूकंपाचा हा चौथा धक्का आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.6 अशी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे आफ्टरशॉक्स दक्षिण तुर्कीमध्ये सीरियाच्या सीमेपासून मालत्या प्रांतापर्यंत 300 किलोमीटर पेक्षा जास्त पसरले आहेत.
जगभरातून मदत : भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय आपत्ती निवारण पथकांपैकी पहिली तुकडी सोमवारी रात्री तुर्कीला रवाना झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी रात्री ट्विट करून शोक व्यक्त केला. त्यांनी सीरियाचे परराष्ट्रमंत्री फैसल मेकदाद यांच्याशी संपर्क साधत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सोमवारी इराकचे पंतप्रधान मोहम्मद एस. अल-सुदानी यांनी घोषणा केली की, ते आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा, प्रथमोपचार आणि निवारा पुरवठा तसेच औषध आणि इंधन पाठवतील. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनीही आपत्तीग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार, तुर्कीमधील भूकंपाला प्रतिसाद म्हणून जपानने देशाच्या आपत्ती निवारण बचाव पथकाला पाठवले आहे. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीला अमेरिकेने देखील मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की ते तुर्कीमध्ये मदत कार्यासाठी शोध आणि बचाव पथके पाठवत आहेत.