वॉशिंग्टन Air Strikes On Houthi Rebels : हुथी बंडखोरांनी अनेक समुद्री जहाजांवर हल्ले केल्याच्या घटना वाढल्या होत्या. त्याला आता अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं संयुक्त मोहीम राबवत मोठं प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं हुथी बंडखोरांवर क्षेपणास्त्र डागले आहे. त्यामुळं हुथी बंडखोरांचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या सैनिकांनी येमेनमधील हुथी बंडखोरांच्या 12 ठिकाणांवर तब्बल 18 ड्रोन आणि दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
गुरुवारी अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्याचा हल्ला :अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं हुथी बंडखोरांच्या तब्बल 12 ठिकाणांवर जोरदार हल्ला केला. अमेरिकन आणि ब्रिटनच्या संयुक्त मोहिमेत हुथी बंडखोरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यात अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त मोहिमेत हुथींच्या 12 ठिकाणांवर टॉमहॉक क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांमधून हल्ला केल्याची माहिती अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. यावेळी या अधिकाऱ्यांनी हुथी बंडखोरांच्या शस्त्र साठवण्याच्या ठिकाणावर हल्ले करण्यात आल्याचं सांगितलं.
इस्रायल युद्धानंतर सुरू झाले होते हुथी बंडखोरांचे हल्ले :इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. येमेनमधील हुथी बंडखोर हे हल्ले करत असल्याचं स्पष्ट झाल्यानं अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी हुथी बंडखोरांना हल्ले थांबवण्याबाबत इशारा दिला होता. मात्र अमेरिकेनं दिलेल्या इशाऱ्यालाही हुथी बंडखोर जुमानले नाहीत. त्यामुळं अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं संयुक्त मोहीम राबवत हुथी बंडखोरांवर हल्ला केला आहे.
चोख प्रत्युत्तर देणार, हुथी बंडखोरांचा इशारा :मंगळवारी हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यापारी जहाजाला लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागलं होतं. त्यामुळं अमेरिकन आणि ब्रिटनच्या सैन्यानं 18 ड्रोन, दोन क्रूज क्षेपणास्त्र आणि एक जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागून प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर गुरुवारी हुथी बंडखोरांनी एडनच्या आखातात जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागलं होतं. मात्र त्यामुळं कोणतंही नुकसान झालं नाही. त्यानंतर हुथी बंडखोरांनी "अमेरिका आणि ब्रिटन सैन्यांनी कोणताही हल्ला केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल," असा इशारा दिला. हुथी बंडखोरांनी 19 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 27 हल्ले केले आहेत.
हेही वाचा :
- रशिया आणि इराणमुळे भारत हुती बंडखोरांच्या निशाण्यापासून वाचू शकेल का?
- हुती विद्रोहींच्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता