देवेंद्र फडणवीस यांचा मॉरिशस दौरा मॉरिशस :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्यासाठी आज सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले. या दौर्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची उपस्थिती असणार आहे. मॉरिशसमध्ये आज मॉरिशस इंडिया बिझनेस समुदायाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील विविध कंपन्यांशी भेटी होतील. येथेच काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार आहेत.
करारांवर स्वाक्षरी :यात पर्यटन क्षेत्रातील करार प्रामुख्याने असणार आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीस घेतील. मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री गानू हे यावेळी सोबत असतील. त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीस घेतील. सायंकाळी साडेसात वाजता येथील मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होईल. त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होईल. दुसर्या दिवशी मराठी समुदायांशी भेटी, असा कार्यक्रम आहे.
मराठी माणसांचा आनंद द्विगुणित :महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पुतळा आज बसवण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस येथील मराठी भवनासाठी ८ कोटी रुपये देणगी स्वरूपात दिले आहेत. ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द केले जाणार आहेत. मॉरिशसमध्ये मराठी बांधवांची संख्या जवळपास ७५ हजार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, रत्नागिरी, पुणे या भागातून गेलेले बरेच मराठी लोक आहेत. हे सर्व मॉरिशसमध्ये मराठी परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम करत आहे. येथे जवळपास मराठी बांधवांच्या ५४ संघटना आहेत.
छत्रपती शिवरायांचा पुतळा : या सर्वांनी एकत्र येत १ मे १९६० रोजी मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन, स्थापन केले आहे. व या फेडरेशन द्वारे महाराष्ट्र दिन, शिवजयंती, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी असे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जातात. अशामध्ये आज छत्रपती शिवरायांचा पुतळा येथे बसवण्यात येणार असल्याने या मराठी बांधवांच्या आनंदात भर पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
हेही वाचा : Shivaji Maharaj Statue In Mauritius: 'या' देशाने उभारला शिवरायांचा पुतळा; २८ एप्रिलला भव्य लोकार्पण सोहळा