महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांची उत्तर कोरियाच्या सीमेवर हुकुमशहा किम जोंग उन यांच्याशी भेट - north korea

उत्तर कोरियाने जागतिक नियमांचे उल्लंघन करत अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्यांच्याशी वारंवार संवाद साधूनही फारसा उपयोग झालेला नाही. तरीही अलिकडच्या काळातील ट्रम्प यांची उत्तर कोरियाच्या बाबतीत नरमाईची भूमिका अचंबित करणारी आहे.

डोनाल्ड ट्रम्प, किम जोंग उन

By

Published : Jun 30, 2019, 10:19 PM IST

प्योंग्यांग - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात आजवर एकाही राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियामध्ये पाऊल ठेवलेले नाही. ट्रम्प आणि उन यांच्यामधील ही तिसरी भेट ठरली. या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होईल असे मानले जात आहे.

या भेटीसाठी ट्रम्प दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांना विभागणाऱ्या काँक्रिटच्या सीमाभिंतीजवळ पोहोचले. या ठिकाणी किम यांनी त्यांचे हस्तांदोलन करीत स्वागत केले. त्यानंतर दोघांनी उत्तर कोरियाची सीमा ओलांडून पुढील प्रवास सुरु केला. तत्पूर्वी ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या सीमेवर पाऊल ठेवताच उन यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करीत छायाचित्रही काढून घेतले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी दक्षिण कोरियाच्या दिशेने चालत जाऊन तिथे उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प म्हणाले, जगासाठी हा एक मोलाचा क्षण असून इथे येणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी 'दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवरील सैन्याच्या ताब्यात नसलेल्या जागी जाऊन आपण किम जोंग उन यांच्याशी बैठक करणार आहोत. आम्ही खूपच चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत,' असे म्हटले होते.'चीनचे राष्ट्रपती शी. जिनपिंग यांच्या बैठकीसह अन्य महत्वाच्या बैठकींनंतर मी जपानहून दक्षिण कोरियाला जाणार आहे. त्याच वेळी, उत्तर कोरियाच्या नेत्यांची इच्छा असेल तर सीमेवर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांना 'हॅलो' म्हणण्याची माझी इच्छा आहे,' असे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.
उत्तर कोरियाने जागतिक नियमांचे उल्लंघन करत अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. अमेरिका किंवा जागतिक संघटनेच्या कोणत्याही निर्बंधांची किंवा कारवाईची तमा न बाळगता त्यांनी अनधिकृत अण्वस्त्र निर्मिती केली आहे. हुकुमशाही राजवटीच्या हाती अण्वस्त्रे असण्याचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. याच कारणाने उत्तर कोरियाने अमेरिकेचा रोष ओढवून घेतला आहे. त्यांच्याशी वारंवार संवाद साधूनही फारसा उपयोग झालेला नाही. तरीही अलिकडच्या काळातील ट्रम्प यांची उत्तर कोरियाच्या बाबतीत काहीशी नरमाईची भूमिका अचंबित करणारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details