अम्मान : ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आता मध्य-पूर्व आशियामध्येही पोहोचला आहे. जॉर्डन देशामध्ये या विषाणूचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती देशाचे आरोग्यमंत्री नाथीर ओबैदात यांनी रविवारी दिली.
१९ डिसेंबरला ब्रिटनहून परतले..
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले हे दाम्पत्य १९ डिसेंबरला ब्रिटनहून परतले होते. सध्या त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत, तसेच त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. खबरदारी म्हणून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे, अशी माहिती नाथीर यांनी दिली.
नवा विषाणू अधिक संसर्गजन्य..
ब्रिटनमध्ये आढळलेले कोरोनाचे हे नवे विकसीत रुप अधिक संसर्गजन्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. सध्या हा विषाणू ब्रिटनसोबत कॅनडा, डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समध्ये पोहोचला आहे.
ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी १४ डिसेंबरला कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनची पुष्टी केली होती. त्यानंतर जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, कित्येक देशांनी इंग्लंडहून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. तसेच, काही देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आपली हद्द बंद केली आहे.
हेही वाचा :कॅनडामध्ये आढळले कोरोनाच्या इंग्लंडमधील स्ट्रेनचे दोन रुग्ण..