जेरुसलेम : इस्राईलमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्याविरोधात निदर्शने केली. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, आणि कोरोना विषाणूचे करण्यात येत असलेले ढिसाळ नियोजन यासाठी त्यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे अशी या आंदोलकांची मागणी होती.
जेरुसलेम स्क्वेअर येथे आंदोलन..
इस्राईलमध्ये कोरोनाचा प्रसार अद्यापही आटोक्यात आला नाही. त्यामुळे देशात तिसरा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये लोकांवर लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, नेत्यानहू यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपाबाबत सुनावणी या आठवड्यात सुरू होणार होती. मात्र, लॉकडाऊनमुळे तीदेखील पुढे ढकलण्यात आली. या सर्व घटनांदरम्यान, शनिवारी लोकांनी जेरुसलेम स्क्वेअर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.
पंतप्रधानांवर आहेत भ्रष्टाचाराचे आरोप..
नेत्यानहू यांच्यावर लाचखोरी, भ्रष्टाचार आणि विश्वासघाताचे आरोप आहेत. या प्रकरणांचा कित्येक दिवसांपासून तपास सुरू आहे. नेत्यानहू यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून, आपण मीडिया ट्रायलचा शिकार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर, अशा आरोपांखाली असणारा नेता देशाचे नेतृत्व योग्य रितीने करु शकत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.