तेल अवीव - इस्रायलमध्ये कोणताच पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्याची स्थिती वर्षभरात तिसऱ्यांदा निर्माण झाली आहे. ज्यू लोकांच्या या देशातील सर्वांत ताकदवान असणाऱ्या दोन पक्षांमध्ये काट्याची टक्कर असल्याने देश तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुकांच्या उंबरठ्यावर आहे.
इस्रायलचे सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा लिक्युड पार्टी हा उजवा पक्ष आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी बेन्नी गँटझ यांचा ब्लू अँड व्हाईट अलायन्स या मध्यम विचारांच्या पक्ष निवडणुकांमध्ये बहुमत मिळवू शकलेले नाहीत. तसेच, युती सरकार तयार करण्यासाठी इतर पक्षांशी कोणताही समझोता करण्यातही अपयशी ठरले आहेत. यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. बेन्नी गँटझ हे इस्रायल माजी लष्करप्रमुख आहेत.
इस्रायलच्या संसदेची सदस्यसंख्या १२० असून बहुमतासाठी यापैकी ६१ जागा आवश्यक आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते कोणाचाही पाठिंबा मिळवू शकलेले नाहीत. यामुळे मार्च २०२० मध्ये पुन्हा निवडणुका होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधी २०१९ मध्ये एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. नेतान्याहू यांना निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी गँटझ यांच्याकडून कडव्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे. गँटझ यांनी चांगली कामगिरी करत सप्टेंबरमधील निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते.