महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

गाझा पट्ट्यातील हिंसाचाराला पूर्णविराम; इस्राईल-हमासची शस्त्रसंधीस मान्यता - इस्राईल हिंसाचार

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्या कार्यालयाने सांगितले, की सुरक्षा मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर रात्री उशीरा इजिप्तचा शांतता प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यापाठोपाठ हमासनेही या शांतता प्रस्तावाला मान्य केले. यानंतर रात्री दोन वाजेपासून ही शस्त्रसंधी लागू होणार असल्याचे इजिप्तच्या एका वृत्तसंस्थेने स्पष्ट केले..

Israel, Hamas agree to cease-fire to end bloody 11-day war
इस्राईल-हमास शस्त्रसंधीसाठी तयार; ११ दिवसांच्या हिंसाचाराला पूर्णविराम

By

Published : May 21, 2021, 6:59 AM IST

जेरुसलेम : गेल्या ११ दिवसांपासून मध्य पूर्वमधील इस्राईल आणि पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेदरम्यान सुरू असलेल्या हिंसाचाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी मान्य करण्यात आली. या हिंसाचारात गाझा पट्ट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्या कार्यालयाने सांगितले, की सुरक्षा मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर रात्री उशीरा इजिप्तचा शांतता प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यापाठोपाठ हमासनेही या शांतता प्रस्तावाला मान्य केले. यानंतर रात्री दोन वाजेपासून ही शस्त्रसंधी लागू होणार असल्याचे इजिप्तच्या एका वृत्तसंस्थेने स्पष्ट केले.

इस्राईलचे लष्कर प्रमुख, आणि मंत्रीमंडळाने एकमताने इजिप्तचा शांतता प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय घेतला. तसेच, हमासच्या एका प्रवक्त्यानेही "जोपर्यंत इस्राईल काही करत नाही, तोपर्यंत हमासदेखील या प्रस्तवाचा सन्मान राखेल" असे स्पष्ट केले. यानंतर तब्बल ११ दिवस सुरू असलेला गाझा पट्ट्यातील हिंसाचार थांबला आहे.

पॅलेस्टिनी नागरिकांच्या विस्थापनावरुन तणाव..

जेरुसलेममधील शेख जार्राह परिसरात गेल्या महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. इस्राईल सरकारने २८ पॅलेस्टिनी कुटुंबांचे विस्थापन करण्याचे जाहीर केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे. याठिकाणी दोन पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्राईलच्या पोलीस अधिकाऱ्यांवर पेपर स्प्रेने हल्ला केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी इस्राईलच्या ओल्ड सिटीमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दंगलीत सुमारे ८० पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.

पॅलेस्टिनी आंदोलकांनी सुरक्षा दलांवर काचेच्या बाटल्या आणि दगड फेकून मारले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर म्हणून स्टन ग्रेनेड आणि वॉटर कॅनन्सचा वापर केले होते. यानंतर हमासने इस्राईलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलनेही गाझा पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले केले होते.

सुमारे २५० लोकांचा बळी; हजारो जखमी..

गाझा पट्टा, वेस्ट बँक आणि इस्राईलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात बुधवारपर्यंत २५६ लोकांचा बळी गेला होता. यामध्ये ६९ लहान मुले, आणि इस्राईलच्या एका जवानाचाही समावेश असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली. संयुक्त राष्ट्रांच्या कोऑर्डिनेशन ऑफ ह्यूमन अफेअर्स विभागाने (ओसीएचए) ही आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले, की गाझा पट्ट्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात २१९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात ६३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच वेस्ट बँकमध्ये २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, यात चार लहान मुलांचा समावेश होता. इस्राईलमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १२ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लहान मुले आणि एका जवानाचा समावेश होता. या सर्व हिंसाचारात हजारो लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे.

गाझा पट्ट्याचे नुकसान; हजारो बेघर..

इस्राईलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये गाझामधील सहा मोठी रुग्णालये आणि नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे उद्ध्वस्त झाली. तसेच, एका मिसाईल हल्ल्यात झालेल्या नुकसानामुळे गाझा सेंट्रल प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीलाही ब्रेक लागला. या सर्व गदारोळात इंधन उपलब्ध नसल्यामुळे एका संस्थेच्या रुग्णालयाचे कामकाजही थांबले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली. दरम्यान, सुमारे ५२ हजार पॅलेस्टिनी नागरिकांनी संयुक्त राष्ट्रांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आश्रय घेतला असल्याची माहिती एका अहवालात समोर आली आहे.

हेही वाचा :गाझा : पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असतानाच झाला मिसाईल हल्ला; पाहा व्हिडिओ..

ABOUT THE AUTHOR

...view details