जेरुसलेम : इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा चिघळला आहे. गाझा पट्ट्यामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर आता इस्राईलने तोफगोळेही डागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
गाझामधील हमास संघटना आणि इस्राईल सरकार यामधील वाद पूर्वीपासून सुरू आहे. याआधी २०१४मध्ये दोन्हींमध्ये भीषण युद्ध झाले होते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले प्रकार हे याच युद्धाची आठवण करुन देणारे आहेत. काही क्षेपणास्त्र तेल अवीव परिसरातदेखील कोसळल्यामुळे अरब आणि ज्यू लोकही आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दंगली उसळत आहेत.
दुसरीकडे, इस्राईलने सोमवारपासून सुरू केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये गाझा पट्ट्यातील तीन मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यापूर्वी इस्रायली सैन्याने गोळीबार करत इमारतींमधील रहिवाशांना बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. गाझाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील १००हून अधिक नागरिकांचा या हवाई हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. यांमध्ये २७ लहान मुले आणि ८ महिलांचा समावेश आहे. तर, सुमारे ५०० नागरिक जखमी झाले आहेत. इस्लामिक जिहाद संघटनेने सात दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले आहे. तर हमास संघटनेचे १३ दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे. इस्राईलच्या मते मारले गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या याहून अधिक आहे.
इस्राईमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, यांमध्ये एका सैनिकाचा आणि एका सहा वर्षीय मुलाचा समावेश आहे.
जगभरातील नेत्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गटेर्रेस यांनी दोन्हीकडून होत असलेल्या क्षेपणास्त्र वापराचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राईलला पाठिंबा जाहीर केला आहे.
हवाई हल्ल्यात उद्धवस्त झालेली इमारत.. पॅलेस्टिनी नागरिकांच्या विस्थापनावरुन तणाव..
जेरुसलेममधील शेख जार्राह परिसरात गेल्या महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. इस्राईल सरकारने २८ पॅलेस्टिनी कुटुंबांचे विस्थापन करण्याचे जाहीर केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे. याठिकाणी दोन पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्राईलच्या पोलीस अधिकाऱ्यांवर पेपर स्प्रेने हल्ला केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी इस्राईलच्या ओल्ड सिटीमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दंगलीत सुमारे ८० पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. पॅलेस्टिनी आंदोलकांनी सुरक्षा दलांवर काचेच्या बाटल्या आणि दगड फेकून मारले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर म्हणून स्टन ग्रेनेड आणि वॉटर कॅनन्सचा वापर केले होते.
या कारणामुळे पुन्हा सुरू झाला संघर्ष..
इस्राईलने 11 मे रोजी गाझा पट्टीतील हनाडी टॉवर या इमारतीवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात २० जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये नऊ लहान बालकांचादेखील समावेश होता. या इमारतीत हमास या कट्टरवादी संघटनेचे कार्यालय असल्याची माहिती आहे. याचाच सूड म्हणून हमास या संघटनेने इस्राईलच्या दिशेने १०० हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये इस्राईलचे महत्त्वाचे शहर असलेल्या तेल अवीवचादेखील समावेश होता. येथूनच या संघर्षाला पुन्हा सुरूवात झाली.
हा संघर्ष जगासाठी नवीन नाही..
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्याताल संघर्ष हा जगासाठी नवीन नाही. या संघर्षाची सुरूवात 100 वर्षांपूर्वी झाली होती. पहिल्या विश्वयुद्धात येथील ऑटोमन साम्राज्याला हार मानावी लागली होती. त्यानंतर ब्रिटनने हा भाग आपल्या ताब्यात घेतला. यादरम्यान येथे अरब आणि ज्यू लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला. अखेर आंतरराष्ट्रीय संघटनांनी याची दखल घेतली. या पार्श्वभूमीवर ब्रिटेनने 1917 मध्ये बालफोर घोषणेंतर्गत ज्यूंसाठी एक वेगळा देश बनवन्याचे मान्य केले. ब्रिटेनच्या या निर्णयावर पॅलेस्टाईन अरब नाराज होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यानही जर्मनीत ज्यूंवरती अत्याचार सुरू होते. त्यामुळे येथील ज्यू नागरीक पॅलेस्टाईनमध्ये आले. परंतु 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईनला अरब आणि ज्यूंमध्ये विभाजित करण्याकरिता मतदान घेतले. तसेच जेरूसलेमला एक आंतराष्ट्रीय शहर म्हणून मान्यता दिली. या निर्णयावरदेखील पॅलेस्टाईन अरब नाराज होते. त्यामुळे ब्रिटीशांनी येथून काढता पाय घेतला. याचदरम्यान, येथील ज्यू नेत्यांनी इस्राईल नावाच्या देशाची घोषणा केली. परंतु याला मध्य-पूर्वमधील इस्लामीक राष्ट्रांनी नेहमीच विरोध केला आहे.
नेमका काय आहे इस्राईल आणि पॅलेस्टाईन वाद..
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला दोन तत्कालीक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे जेरूसलेम हे शहर. तत्पूर्वी हा संघर्ष समजून घेण्याआधी या शहराचे धार्मीक महत्त्व समजून घ्यावे लागेल. खरं तर जेरूसलेम हे शहर ईसाई, मुस्लीम आणि ज्यू या तिन्ही धर्मातील लोकांसाठी महात्त्वाचे शहर आहे. ईसाई धर्मातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेले पवित्र सेपुलचर चर्च येथेच आहे. हे चर्च येशूंच्या मृत्यूंशी आणि त्यांच्या पुर्नजन्माशी संबंधित असल्याने त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तर येथील अल अक्सा मशीद ही मुस्लीम धर्मीयांसाठी तिसरे पवित्र स्थान आहे. येथूनच मोहम्मद पैगंबरांनी ईहलोक सोडला, असे मुस्लीम धर्मीयांचे म्हणणे आहे. तसेच ज्यू लोकांसाठीसुद्धा जेरूसलेम मह्त्त्वाचे शहर आहे. ज्यूंचे पवित्र ठिकाण असलेले कोटल (पश्चिमी भींत) येथेच आहे. याच भींतीपासून जगाची निर्मिती झाली, असे ज्यू लोक मानतात. एकंदरीत तीनही धर्माच्या लोकांसाठी जेरूसलेम हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. इस्राईलच्या म्हणण्यानूसार जेरूसलेम ही त्यांची राजधानी आहे. तर पॅलेस्टाईनला हे शहर भविष्यातील आपली राजधानी म्हणून घोषित करायची आहे. यावरून इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद वर्षानुवर्षांपासून सुरू आहे.
हेही वाचा :गाझा : पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असतानाच झाला मिसाईल हल्ला; पाहा व्हिडिओ..