महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पंतप्रधानपदासाठी अल्लावी यांच्या नावावरून इराकी आंदोलकांमध्ये नाराजी..

अल्लावी हे संसदेचे माजी सभासद तसेच माजी मंत्री आहेत, त्यामुळे जी व्यवस्था बदलली गेली पाहिजे त्या व्यवस्थेचाच ते एक भाग असल्याची टीका देशातील तरूण आंदोलक करत आहेत. यामुळेच अल्लावी यांच्या नावाला त्यांनी विरोध दर्शवला आहे.

Iraqi protesters reject nomination of PM-designate Allawi
पंतप्रधानपदासाठी अल्लावी यांच्या नावावरून इराकी आंदोलकांमध्ये नाराजी..

By

Published : Feb 2, 2020, 7:35 PM IST

बगदाद -इराकच्या पंतप्रधानपदी मोहम्मद अल्लावी यांचे नाव पुढे येताच, देशातील आंदोलकांनी त्यावर तीव्र नाराजी दर्शवली आहे. देशात सुरू असणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनांमुळे माजी पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षांकडून अखेर अल्लावी यांच्या नावावर एकमत झाले होते, मात्र त्यालाही आता आंदोलकांनी विरोध दर्शवला आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून इराकच्या प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः दक्षिणी भागात सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि रक्तपाताची जबाबदारी सरकारने घ्यावी; देशात निवडणुका घ्याव्यात आणि पंतप्रधानपदी अपक्ष उमेदवाराची निवड व्हावी अशा काही मागण्या हे आंदोलक करत आहेत. अल्लावी हे संसदेचे माजी सभासद तसेच माजी मंत्री आहेत, त्यामुळे जी व्यवस्था बदलली गेली पाहिजे त्या व्यवस्थेचाच ते एक भाग असल्याची टीका देशातील तरूण आंदोलक करत आहेत. यामुळेच अल्लावी यांच्या नावाला त्यांनी विरोध दर्शवला आहे.

इराकच्या दक्षिणेकडील शहर असलेल्या दिवानियाहमध्ये आंदोलकांनी सरकारी कार्यालयांवर मोर्चा काढत, एक दिवसासाठी ते बंद ठेवण्याची मागणी केली. तर, विद्यार्थ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन केले. हिल्लाह शहरातील आंदोलकांनी रस्त्यांवर येत वाहतूक ठप्प केली. "अल्लावी हे लोकांनी निवडलेले नेते नाहीत" अशा आशयाची घोषणाबाजी यावेळी आंदोलक करत होते. देशाची राजधानी असलेल्या बगदादमध्येही शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी अल्लावी यांच्या छायाचित्रावर मोठी काट मारलेले पोस्टर्स हातात घेतले होते.

२००३ मध्ये हुकुमशाह सद्दाम हुसैन याची सत्ता कोसळल्यानंतर अल्लावी खासदार म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान नुरी-अल-मलिकी यांच्या सरकारमध्ये संचार मंत्री म्हणून दोन वेळा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सरकारमधील भ्रष्टाचाराचे कारण देत दोन्ही वेळा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. देशाचे राष्ट्रपती बरहम सालेह यांनी विरोधकांना आपला उमेदवार निवडण्याची शनिवारपर्यंतची मुदत दिली होती. अन्यथा आपण स्वतः पंतप्रधानपदासाठी उमेदवार जाहीर करू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर, विरोधकांनी अल्लावी यांचे नाव पुढे केले होते.

हेही वाचा : अमेरिकेच्या बगदादमधील दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला!

ABOUT THE AUTHOR

...view details