बगदाद : इराकची राजधानी बगदादमधील एका रहिवासी परिसरात रस्त्यानजिक झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर अनेक जण जखमी झाले आहेत. बाजारातील गर्दीच्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
ईद खरेदीच्या गर्दीदरम्यानच स्फोट
इराक लष्कराच्या माहितीनुसार, सद्र शहरातील वहैलात मार्केटमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. ईदच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी असताना स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र यापूर्वी इथे झालेल्या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचे समोर आलेले आहे.
पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेश
पंतप्रधान मुस्तफा अल-खदीमी यांनी तातडीने हल्ल्याच्या चौकशीचे आदेश देत केंद्रीय पोलीस रेजिमेंटच्या कमांडरकडे याची जबाबदारी सोपविली आहे. पूर्व बगदादमधील गर्दीच्या भागात बॉम्बस्फोट होण्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे.
जून आणि एप्रिलमध्येही बॉम्बस्फोट
यापूर्वी जूनमध्ये सद्र शहरातील गर्दीच्या भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता. तर एप्रिलमध्ये सद्र शहरात झालेल्या कार बॉम्बस्फोटात चार जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात मध्य बगदादमधील एका व्यावसायिक भागात झालेल्या दुहेरी आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इराकमध्ये दोन महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
हेही वाचा -इराकमध्ये रुग्णालयाला आग; कोरोना वॉर्डमधील 50 रुग्णांचा मृत्यू