बगदाद :दक्षिण इराकच्या एका कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये 50 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कित्येक रुग्ण जखमी झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सोमवारी स्पष्ट केले.
धी कार प्रांतामध्ये असलेल्या अल-हुसैन टीचिंग हॉस्पिटलमध्ये रविवारी ही आग लागली होती. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने मात्र ही आग ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे लागली असल्याचं म्हटलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने अद्याप या आगीचं नेमकं कारण स्पष्ट केलं नाही. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच या रुग्णालयात कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आला होता. यामध्ये 70 बेड होते, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. धी कार आरोग्य विभागाचे प्रवक्ते अम्मार अल झमिली यांनी सांगितलं, की आग लागली तेव्हा या वॉर्डमध्ये 63 रुग्णांवर उपचार सुरू होते.