आमच्या दिशेने एक जरी गोळी सुटली तर बघा, इराणची अमेरिकेला धमकी - drone
'इराणच्या दिशेने एक जरी गोळी सुटली तरी, इराण अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या मध्य पूर्वेतील हितसंबंधांना संपवून टाकेल,' अशी धमकी इराणी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबोलफजल शेकार्ची यांनी दिली.
तेहरान - अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत. इराणने शनिवारी पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे. 'इराणच्या दिशेने एक जरी गोळी सुटली तरी, इराण अमेरिकेला पेटवून द्यायला कमी करणार नाही,' अशी धमकी इराणने अमेरिकेला दिली आहे. गुरुवारी इराणने अमेरिकेचे मानवरहित ग्लोबल हॉक ड्रोन विमान पाडले होते.
इराणच्या या कृतीनंतर अमेरिकेने इराणवर हल्ल्याची तयारी केली होती. नंतर हा निर्णय मागेही घेण्यात आला. मात्र, त्यामुळे या भागात निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. 'इराणच्या दिशेने एक जरी गोळी सुटली तरी, इराण अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या मध्य पूर्वेतील हितसंबंधांना संपवून टाकेल,' अशी धमकी इराणी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबोलफजल शेकार्ची यांनी दिली.
अमेरिकेचे टेहळणी ड्रोन आमच्या हवाई हद्दीत आल्यामुळे ते पाडले असे इराणचे म्हणणे आहे तर ड्रोनने इराणच्या सीमेचे उल्लंघन केले नव्हते ते आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते असा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल इराणवर हल्ल्याची तयारी केली होती. पण थेट लष्करी कारवाईत इराणध्ये १५० लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे केवळ १० मिनिटे आधी हल्ल्याचा निर्णय रद्द केला, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेला काहीही निर्णय घेऊ दे. आम्ही इराणच्या कुठल्याही सीमांचे उल्लंघन करु देणार नाही. आमची युद्धाची इच्छा नाही. मात्र, असा कुठलाही प्रयत्न झाल्यास तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊ असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या शत्रूंनी खासकरुन अमेरिका आणि त्यांच्या मित्रांनी हल्ल्याची चूक केल्यास त्याची झळ अमेरिकेला सहन करावी लागेल, असा इशारा इराणने दिला आहे.