बगदाद- लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. इराकमधील अल-अस्साद या अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. काल (मंगळवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इराणने क्षेपणास्त्रे डागली.
इराणचा अमेरिकी तळावर पुन्हा हल्ला इराणने इराकमधील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ८० अमेरिकी ठार झाल्याचा दावा इराकच्या सरकारी वृत्तसंस्थेने केला आहे. मात्र, याबाबतचे वृत्त स्वतंत्ररीत्या पडताळून पाहता येत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
इराणची निम-अधिकृत वृत्तसंस्था फार्स न्यूज एजन्सीने आपल्या ट्विटर हँडलवरून क्षेपणास्त्र सोडतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी "इराणच्या सूडाची सुरुवात; अमेरिकेच्या अल-अस्साद येथील लष्करी तळावर इराणी क्षेपणास्त्रे हल्ला करतानाचा क्षण" अशा आशयाचा मथळा दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या हल्ल्याची माहिती देण्यात आली, असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. इस्रायलवर हल्ला केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणला दिला आहे.
अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे सहायक जॉनथन हॉफमन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इराणने दहा ते बारा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर डागल्या, अशी माहिती त्यांनी दिली.
इराणने या हल्ल्याच्या मोहिमेला 'शहीद सुलेमानी' असे नाव दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कुर्दिश स्वायत्त प्रदेशातील इरबील या तळावरही इराणने हल्ला केल्याच्या वृत्ताला अमेरिकेने दुजोरा दिला आहे. मंगळवारी इराणने कासिम सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्याला लक्ष्य केले.
१९७९ नंतर अमेरिका आणि इराणने एकमेकांवर पहिल्यांदाच उघडपणे हल्ला केला आहे. याआधी दोन्ही देश एकमेकांवर लपून-छपून कारवाया करत होते. इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेला धमकीही दिली आहे, अल असाद तळावर केलेल्या हल्ल्याचा प्रत्युत्तर न देण्याची धमकी इराणने अमेरिकेला दिली आहे.
'ज्या देशांनी दहशतवादी अमेरिका लष्कराला त्यांची जमीन लष्करी तळासाठी दिली आहे, त्यांनाही आम्ही इशारा देत आहोत. जर ही जमीन इराणविरुद्ध हल्ला करण्यासाठी वापरली गेली तर इराण तेथे हल्ला करेल, असे प्रसिद्धीपत्रक इराणने जारी केले आहे.
अमेरिकेचे ५ हजारांच्या आसपास लष्कर इराकमध्ये तळ मांडून आहे. कट्टरतावादी गट इसिसशी लढण्यासाठी इराकने अमेरिकेकडून लष्करी मदत घेतली आहे. मात्र, अमेरिकेने आपले सैन्य माघारी बोलवावे असा दबाव इराणकडून आणला जात आहे, तसेच अमेरिकेचे सैन्य माघारी पाठवण्यासंबधी इराकही विचार करत आहे.
बगदादमधील अल-जदरीया आणि बलाद हवाई तळाबाहेर ५ जानेवारीला(रविवारी) इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले होते. अमेरिकी दूतावास असलेल्या भागातही रॉकेट हल्ला झाला. इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच हा हल्ला युद्ध थांबवण्यासाठी होता युद्ध सुरू करण्यासाठी नव्हता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.