सियोल - 'अमेरिकेने मागण्या मान्य केल्या तरच अणुकरारावर चर्चा होईल,' असे उत्तर कोरियाने शनिवारी स्पष्टपणे म्हटले आहे. अमेरिकेने आमच्या मागण्या पूर्णपणे स्वीकाराव्यात, असे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र मिळाले होते, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाचे विदेश मंत्रालयाचे सल्लागार किम क्ये ग्वान यांनी ही माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प आणि किम यांच्यादरम्यान जून 2018 पासून तीन बैठका झाल्या आहेत. गत फेब्रुवारीमध्ये हनोई येथे झालेल्या बैठकीनंतर त्यांच्या चर्चेत अडथळा निर्माण झाला होता. विदेश सल्लागार ग्वान यांनी अमेरिका उत्तर कोरियाला दगा देत असल्याचे म्हटले आहे. 'मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून आम्हाला चर्चेत अडकवून ठेवण्यात आले आणि आमचा वेळ फुकट घालवला,' असे त्यांनी म्हटले आहे. 'आता अमेरिकेने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतरच आमच्यामधील चर्चा पुन्हा सुरू होऊ शकेल,' असेही ग्वान पुढे म्हणाले.
उत्तर कोरियाने कधीही अधिकृतरीत्या राष्ट्राध्यक्ष किम यांचे वय किंवा त्यांच्या जन्मतारखेविषयी माहिती जारी केलेली नाही. मात्र, आठ जानेवारी 2014 ला त्यांना प्योंग्यांग येथे एका प्रदर्शनार्थ बास्केटबॉल सामन्याआधी स्टार खेळाडू डेनिस रोडमॅन यांनी 'हॅप्पी बर्थडे' म्हटले होते, ही बाबही महत्त्वाची आहे.