बीजींग - चीन, रशिया आणि इराण या तीन देशांचा संयुक्त नौदल सराव हा २७ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे. ओमानच्या आखातात हा सराव होणार असल्याची माहिती चीनच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी दिली.
चीनच्या नौदलाकडून या सरावासाठी 'शिनिंग' हे क्षेपणास्त्र नाशक पाठवण्यात येणार असल्याची माहिती वु क्वियान या राष्ट्रीय संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. या तीन देशांच्या नौदलांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य वाढावे या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, आपापल्या नौदलाची क्षमता दाखवणे, आणि एकमेकांप्रती सद्भावना वाढवून विश्वशांतीसाठी एकत्रितरित्या प्रयत्न करणे यासाठी हा सराव घेण्यात येणार आहे, असे वु यांनी सांगितले.