काबुल : अफगाणिस्तानमध्ये रविवारी एका कारमधील बॉम्बचा स्फोट झाला. या आत्मघातकी हल्ल्यात १२ नागरिक ठार झाले असून, सुमारे १००हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागातील घोर प्रांतात हा हल्ला झाला.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता..
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारीक आरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोर प्रांताच्या पोलीस मुख्यालयासमोर हा स्फोट झाला. याच परिसरात आजूबाजूला शासकीय कार्यालयेही असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घोरमधील एका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही..
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. मात्र, तालिबानने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान आणि अफगाण सरकारमध्ये सध्या शांतता कराराबाबत चर्चा सुरू आहेत. शुक्रवारीच तालिबानने दक्षिण अफगाण भागात हल्ले न करण्याबाबत हमी दिली होती.
शांतता करारानंतरही हल्ले सुरूच..
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांतता करारानुसार, अमेरिकेने हवाई हल्ले बंद केले असले, तरी तालिबान मोठ्या प्रमाणावर हल्ले करतच आहे. फेब्रुवारी महिन्यातील शांतता करारानंतर जुलैपर्यंत तालिबानने दहा हजारांपेक्षा जास्त अफगाणी सैनिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
हेही वाचा :दक्षिण कोरिया न्यूक्लिअर इंधन विकत घेतंय; उत्तर कोरियामधील माध्यमांचा दावा