काबुल :अफगाणिस्तानच्या कुंडुझ जिल्ह्यात झालेल्या एका बॉम्बस्फोटात चार जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा संंचलनालयाच्या (एनडीएस) इमारतीत हा स्फोट झाला. आज सकाळीच अफगाणच्या घोर प्रांतात एक आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा कुंडुझमध्ये स्फोट झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडुझमधील एनडीएसच्या उपसंचालकांच्या कारमध्येच हा बॉम्ब बसवण्यात आला होता. ही कार इमारतीत पार्क करुन उपसंचालक आपल्या कार्यालयात गेल्यानंतर हा बॉम्ब फुटला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, त्यामध्ये उपसंचालकांच्या चालकाचाही समावेश आहे. सकाळच्या हल्ल्याप्रमाणेच याही हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.