काबूल - अफगाणिस्तानात सुरक्षा दलांनी देशाच्या विविध भागात १९ तालिबान्यांना कंठस्नान घातले आहे. तालिबान चळवळीचा उपप्रमुख मुल्ला अमानुल्ला हा सुद्धा या हल्ल्यात ठार झाला झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तालिबान अफगाणिस्तानात शांतता चर्चा सुरू असतानाही संघर्ष सुरूच आहे.
मुल्ला अमानुल्ला हा देशातील हिलमंद प्रांतात कार्यरत होता. त्याच्यासह इतर ८ दहशतवाद्यांना अफगाणिस्तान हवाई दलाने ठार केले आहे. हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही नष्ट करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून माहिती दिली आहे. यासोबतच फरयाब प्रांतातील कैसार जिल्ह्यात दहा तालिबान्यांना ठार करण्यात आले आहे. या घटनेवर तालिबानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
शांतता चर्चा सुरू असतानाही हिंसा
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या सहकार्याने तालिबान अफगाणिस्तान सरकारमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या. मात्र, ही बोलणी सुरू असतानाही तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. शांतता चर्चा यशस्वी झाल्यास अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघारी जाणार आहेत.
भारताचा शांतता चर्चेला पाठिंबा
डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला हे 'हाय कौन्सिल ऑफ नॅशनल रिकन्सिलेशन' या शांतता प्रक्रियेसाठी खास तयार करण्यात आलेल्या संघटनेचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्त्वाखाली कतार देशातील दोहा शहरात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. नुकतेच अफगाणिस्तानचे डॉ. अब्दुल्ला यांनी भारताला भेट दिली. भारताने तालिबान-अफगाणिस्तान शांतता चर्चेला पाठिंबा दिला आहे. मागील काही दशकांपासून अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जर चर्चा प्रक्रिय यशस्वी झाली तर देशातील संघर्ष कायमचा मिटेल.