काबुल : शांतता करारासाठी कित्येक स्तरावर प्रयत्न करुनही अफगाणिस्तानमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. तीन आणि चार जून या दोन दिवसांमध्ये सुरक्षा दले आणि तालिबान्यांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये तब्बल ११२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले, की यादरम्यान देशाचे सुमारे १९६ जवानही जखमी झाले आहेत. टोलो वृत्तवाहिनीने याबाबत रविवारी माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जूनला ५४ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, चार जूनला ६५ लोकांचा मृत्यू झाला. या ११९ जणांमध्ये सुरक्षा दलांमधील १०२ जणांचा समावेश होता. तर, १७ नागरिकांचा यात बळी गेला. या दोन दिवसांमध्ये ५५ नागरिक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
सुमारे ३५० तालिबान्यांचा खात्मा - संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठ प्रांतांमध्ये चकमकी घडल्या. या प्रांतांमध्ये तीन जूनला १८३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर, ४ जूनला केलेल्या कारवाईमध्ये १८१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, तालिबानने ही आकडेवारी फेटाळली आहे.
अफगाणमधील हिंसाचार थांबेना..
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारात गेल्या वर्षी २,९५० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच, ५,५४० नागरिक जखमी झाले होते. देशाच्या मानवाधिकार आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यांपैकी ५३ टक्के लोक हे तालिबानच्या कारवायांमध्ये; तर १५ टक्के हे सुरक्षा दलांच्या कारवायांमध्ये जखमी झाल्याचे सांगितले आहे. बाकी नागरिक अज्ञातांच्या कारवायांमध्ये जखमी झाल्याचे आयोगाने सांगितले.
हेही वाचा :पाकिस्तान : दोन रेल्वेंचा अपघात; 30 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी