पॅरिस- शाळेत मुलांना शिकवत असताना मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखविल्याने एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराजवळ ही घटना घडली. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली असून यास चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.
शुक्रवारी दुपारी पॅरीस शहराच्या उत्तर भागातील एका शाळेत भुगोल विषयाच्या शिक्षकाने वर्गात शिकवताना मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखविले होते. वर्गातील मुस्लिम मुलांच्या पालकांनीही याचा विरोध केला होता. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने शिक्षकाची हत्या केली. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती फ्रान्समधील वृत्तपत्रांनी दिली आहे.
संपूर्ण देश या हत्येविरोधात एकवटला आहे. देशातली नागरिकांना मुक्तपणे जगता यावे, म्हणून आम्ही या घटनेला चोख प्रत्युत्तर देऊ, आम्ही कधीही हार मानणार नाही, कधीही नाही, असे ट्विट पंतप्रधान कास्टेक्स यांनी केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण फ्रान्स शहरात खळबळ उडाली आहे.