लंडन– भारत आणि चीनने सीमारेषेच्या वादाबाबत चर्चा करावी, असे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आवाहन केले आहे. पूर्व लडाखमधील तणावाची स्थिती ही खूप गंभीर आहे. या स्थितीबाबत इंग्लंडला चिंता आहे. आम्ही परिस्थितीकडे जातीने लक्ष देत आहोत, असे त्यांनी सांगितले.
भारत-चीनच्या तणावावर पहिल्यांदाच इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मत व्यक्त केले आहे. ते संसदेमध्ये पंतप्रधानांच्या दर आठवड्याला होणाऱ्या प्रश्नोत्तराच्या वेळेत बोलत होते.
कॉमनवेल्थच्या सदस्यांमध्ये वाद असताना इंग्लंडच्या हितावर काय परिणाम होणार आहे? असा प्रश्न कॉन्झरव्हेटिव्ह पक्षाचे खासदार फ्लिक ड्रम्मंड यांनी बोरिस यांना संसदेमध्ये विचारला होता. एक देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला तर दुसरा लोकशाहीच्या संकल्पनेला आव्हान देणारा आहे, याकडेही खासदार फ्लिक ड्रम्मंड यांनी पंतप्रधान बोरिस यांचे लक्ष वेधले होते. यावर पंतप्रधान बोरिस म्हणाले, की सर्वात चांगली गोष्ट आपण करू शकतो, ते म्हणजे दोन्ही पक्षांना चर्चेसाठी प्रोत्साहित करणे आहे. चर्चेत सीमारेषेवेर चर्चा होवून त्यावर दोघांमध्ये तोडगा काढू शकतो, असेही ते म्हणाले.