बर्मिंगहॅम -युनायटेड किंग्डममधील अनिवासी भारतीयांनी बर्मिंगहॅममध्ये काश्मीरविषयी भारतविरोधी प्रचाराविरोधात निदर्शने केली. आर्टिकल ३७० रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणी पाकिस्तान समर्थकांकडून भारतविरोधी प्रचार सुरू आहे.
इंडो-युरोपियन काश्मीर फोरम (आयईकेएफ) आणि हिंदू कौन्सिल युके (एचसीयूके) यांच्यातर्फे हा निषेध करण्यात आला. या ठिकाणी भारताच्या ध्वज घेऊन जवळपास ४० निदर्शक जमा झाले होते. त्यांनी भारत सरकारच्या जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.
'काश्मिरी पंडितांना परत आणा' अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. आर्टिकल ३७० आणि ३५ए रद्द करण्यामुळे भारत आणि काश्मीर एक होतील, असे त्यांच्याकडील फलकांवर लिहिले होते.
हेही वाचा - भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हरू शकतो - इम्रान खान
आयईकेएफने भारत सरकारला तोंडी पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे काश्मिरी पंडितांना न्याय मिळेल, असे म्हणत या संस्थेकडून भारत सरकारचे कौतुक करण्यात आले. काश्मिरी पंडितांना त्यांच्या पूर्वापार असलेल्या राहत्या घरांमधून १९८९-९० मध्ये हाकलून देण्यात आले. भारताने काश्मीरविषयी उचललेल्या पावलामुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाककडून भारतविरोधी प्रचार केला जात आहे. मात्र, या प्रकरणी जम्मू-काश्मीरविषयीचा निर्णय ही आपली 'अंतर्गत बाब' असल्याची ठाम भूमिका भारत सरकारने घेतली आहे.
हेही वाचा - काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्राला विनंती