माद्रिद (स्पेन) -वैद्यकशास्त्राच्या जगातली सर्व गृहीतके, वस्तुस्थिती, उपचार आणि वैद्यक शास्त्रातील ज्ञान यांना बाजूला सारून अनेक चमत्कार होत असतात. असाच चमत्कार अॅना डेल व्हॅली या शंभरी ओलांडलेल्या आजीबाईंच्या आयुष्यात दोनदा घडलाय. या आजीबाई त्यांच्या या दीर्घ आयुष्यातल्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर दोन वेगवेगळ्या महामाऱ्यांच्या तडाख्यात सापडल्या होत्या. या दोन्हींवर मात करत त्यांनी वैद्यकशास्त्राला आणि लोकांना चकित करून सोडलंय.
जिगरबाज..! तिने 1918 मध्ये स्पॅनिश फ्लूवर केली मात, आता कोविड-19लाही हरवलं - 1918 मध्ये स्पॅनिश फ्लूवर मात 2020 मध्ये कोविड-19लाही हरवलं
आयुष्याच्या इनिंगमध्ये जिगरबाज खेळी करणाऱ्या एक स्पॅनिश आजीबाई कौतुकाचा विषय बनल्या आहेत. अॅना डेल व्हॅली असं आजीबाईंचं नाव. त्यांना खेळण्या-बागडण्याच्या वयात 1918 साली स्पॅनिश फ्लू झाला होता. तेव्हाच्या जगाच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना ग्रासलेल्या या महामारीवर त्यांनी वयाच्या 5 व्या वर्षी मात केली होती. आता 2019-2020 मध्ये महामारी बनलेल्या कोविड-19लाही त्यांनी हरवलं आहे.
अॅना आजीबाईंचा जन्म ऑक्टोबर 1913 मध्ये झाला. आणखी सहा महिन्यांत त्या 107 वर्षांच्या होतील. 1918 साली वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना 'स्पॅनिश फ्लू' झाला होता. त्या काळात जगभरात थैमान घातलेल्या या महामारीने 500 दशलक्ष लोकांना ग्रासले होते. तब्बल 36 महिने (जानेवारी 1918 ते डिसेंबर 1920) घोंगावणार्या या वादळाने जगाची एक तृतीयांश लोकसंख्या काबीज केली होती. अशा महामारीवर कोवळ्या वयात दोन हात करत या आजीबाईंनी जीवनाची लढाई जिंकली होती आणि नंतर 'शतक'ही ठोकले. आता कोविड-19 या महामारीने पुन्हा त्यांना काळाचा घास बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुष्याच्या संध्याकाळीही तितक्याच तडफदारपणे या आजारालाही त्यांनी नमवले. अॅना आजीबाईंनी पुन्हा एकदा मृत्यूचा पाश झुगारून दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अॅना आजीबाई रोंडा येथे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. या भागात राहणाऱ्या इतर 60 रहिवाशांसह त्यांनाही कोरोना बाधित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. यासह कोविड-19 वर मात करणाऱ्या जगातील सर्वाधिक वृद्धांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीतून वाचलेल्या सर्वाधिक वृद्ध व्यक्तींमध्ये कॉर्नेलिया रास या 107 वर्षांच्या डच आजीबाई सध्या पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्यानंतर जगात दुसर्या स्थानावर राहण्याचा विक्रम अॅना आजीबाईंच्या नावावर जमा झाला आहे.