कीव - रशियाच्या लष्कराने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खार्किवमधील गॅस पाइपलाइन उडवली आहे. या स्फोटामुळे पर्यावरणीय आपत्ती देखील होऊ शकते. यासोबतच येथील रहिवाशांना खिडक्या ओल्या कपड्यांनी झाकून भरपूर द्रवपदार्थ पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रशियन सैन्याला खार्किव ताब्यात घेण्यात यश आलेले नाही आणि तेथे भीषण लढाई सुरू आहे. सुमारे 1.5 दशलक्ष लोकसंख्या असलेले खार्किव हे रशियन सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी रशियाचे लष्करी आक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताकडे राजकीय पाठिंबा मागितला. युक्रेन विरुद्ध रशियाच्या "आक्रमक वर्तनाचा" "तीव्र निषेध" करणार्या अमेरिकेच्या ठरावावर भारताने UNSC मध्ये मतदान करण्यापासून दूर राहिल्यानंतर काही तासांनंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संभाषण झाले.
जर्मनी आणि फ्रान्सने युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कीवपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर एका नदीच्या काठावर रशियन सैन्य थांबले आहे. त्याच वेळी, युक्रेनच्या सैनिकांनी शहराच्या काठावर वेढा घातला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा निर्धार -
युक्रेनचे सैनिक जिगरीने लढत असून देश वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कीव सोडण्यासाठी विमान पाठवण्याची ऑफरही दिली आहे. पण वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा ‘एक्झिट प्लान’ ( Volodymyr Zelenskyy declines US offer to evacuate Kyiv )नाकारला आहे. युद्ध सुरू असताना देश सोडून पळून जाण्यासाठी विमान नाही, तर मला शस्त्रे पुरवा, असे म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शेवटच्या श्वावासापर्यंत रशियन सैनिकांविरोधात निकारने लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आप कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा -Ukraine President-PM Modi : युक्रेनच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान मोदींना फोन; म्हणाले, वाचवा...