मॉस्को- रशियामध्ये रविवारी कोरोनाने कहर केला. एका दिवसामध्ये देशात तब्बल १०,६३३ रुग्णांची नोंद करण्यात आली. ही २४ तासांमध्ये नोंद झालेली आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे रशियातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,३४,६८७ वर पोहोचली आहे. देशाच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.
रशियाच्या एका वृत्तवाहिनीने सांगितल्याप्रमाणे, ३० एप्रिलनंतर रशियामधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. यासोबतच, रविवारी रशियामध्ये ५८ बळींची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या १,२८० झाली आहे. तर आतापर्यंत १६,६३९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.